सुरत : वृत्तसंस्था
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरातच्या सुरतच्या जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा दिली आहे. सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे? असा सवाल त्यांनी केला होता. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर सुरतच्या जिल्हा न्यायालयाने आपला निकाल देत राहुल गांधींना दोषी ठरवले आणि २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच त्यांना जामीनही मंजूर केला आहे.
2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधींनी मोदी आडनावावरून जोरदार टीका केली होती. त्यावेळी त्यांनी निरव मोदी, ललित मोदी आणि नरेंद्र मोदी अशी नाव घेत सगळ्या चोरांची आडनाव मोदी का असतात असा सवाल केला होता. राहुल यांच्या वादग्रस्त विधानाविरोधात गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी याचिका दाखल केली होती. आज त्यावर कोर्टाने राहुल गांधींना दोषी ठरवलं.
आज या प्रकरणी निकाल सुनावण्यात आला तेव्हा राहुल गांधी सुरत जिल्हा न्यायालयात हजर होते. मी कायमच भ्रष्टाचाराविरोधात बोलतो. मी कोणाच्या विरोधात मुद्दामहून बोललो नाही. यामुळे कोणाला नुकसान झालेले नाही असे म्हणत कोर्ट आपल्याला जी काही शिक्षा देण्यात येईल ती मान्य असेल असं राहुल गांधी यांनी यापूर्वीच म्हंटल होते.