जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका महिलेला बंधन बँकेतून बोलत असल्याचे सांगून फिक्स डिपॉजिट अपडेट करण्याच्या नावाखाली ओटीपी क्रमांक घेत आठ लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात घडला. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार ढाके कॉलनीतील राहिवासी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी दुपारी पावणेचार वाजता त्यांच्या मोबाईलवर भामट्याने बंधन बँकेतून बोलत असल्याचे सांगून एफ.डी.अपडेट करायची असल्याने तुमच्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी सांगा, असे सांगत विश्वास संपादन करून त्यांच्या बँक खात्यातून सात लाख 75 हजारांची रक्कम अन्यत्र वळवत फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास प्रभारी पोलिस निरीक्षक किसनराव नजन-पाटील करीत आहेत.