मुंबई : वृत्तसंस्था
गुढीपाडव्यानिमित्त मनसेची शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर सभेत माहिम समुद्र किनारी होत असलेल्या अनधिकृत बांधकामाकडे सरकारचं लक्ष वेधलं. त्यानंतर लगेचच रात्रीत कारवाईचे आदेश देण्यात आले आणि सकाळ-सकाळी लगेचच या पाडकामाला सुरुवातही झाली. आता हे काम पूर्ण झालं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल गुढीपाडव्यानिमित्त आयोजित सभेमध्ये माहिमच्या समुद्राच्या भागामध्ये होणाऱ्या अनधिकृत बांधकामाविषयीची माहिती दिली. त्यानंतर लगेचच रात्रीत मुंबई महापालिकेने हे बांधकाम हटवण्याचे आदेश दिले. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास महापालिकेचे पथक माहिम इथं दाखल झालं आणि पाडकामाला सुरुवात झाली. माहिम इथं दर्ग्याची मजार आहे. ही मजार ६०० वर्षांपूर्वीची असल्याचा दावा इथल्या ट्रस्टने केला आहे. त्यामुळे ही मजार न हटवता फक्त तिच्या आजूबाजूचं बांधकाम हटवण्यात येत आहे. सकाळी ८ वाजता इथल्या पाडकामाला सुरुवात झाली असून आता हे बांधकाम पूर्ण झालं आहे.
काल झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी एक व्हिडीओ दाखवला. या व्हिडीओमध्ये त्यांनी माहिम परिसरामध्ये अनधिकृत बांधकाम होत असल्याचं दाखवलं होतं. त्या दर्ग्यावर जर एका महिन्याच्या आत कारवाई झाली नाही, तर त्याच्या बाजूला आपण गणपतीचं मंदिर बांधू असा इशारा राज ठाकरे यांनी काल दिला होता. त्यानंतर लगेचच माहिम परिसरातली सुरक्षा पोलिसांनी वाढवली. त्याबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेशही काढले. सकाळी ८ वाजताच कारवाई सुरू झाली आणि अवघ्या दोन तासांत बांधकाम हटवण्यात आलं.