जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यात गत दीड वर्षांपासून रखडलेल्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून दि. 27 मार्चपासून निवडणूक प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. जिल्ह्यातील 12 कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मंगळवारी सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या. यात जिल्ह्यातील 12 कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान 12 पैकी 6 बाजार समित्यांसाठी 28 आणि उर्वरीत 6 बाजार समित्यांसाठी 30 रोजी मतदान होणार आहे. दि. 23 रोजी निवडणूक प्राधिकरणाची बैठक होणार असून त्यात बाजार समित्यांचे मतदानासाठी वर्गीकरण केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या बाजार समित्यांची होणार निवडणूक
जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, धरणगाव, बोदवड, जामनेर, चाळीसगाव, पारोळा, पाचोरा, अमळनेर, यावल आणि रावेर या बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
निवडणूक जाहीर करणे – दि. 27 मार्च
नामनिर्देशन पत्र स्विकारणे – दि. 27 मार्च ते 3 एप्रिल
नामनिर्देशन पत्रांची छाननी – दि. 5 एप्रिल
वैध उमदेवारांची यादी प्रसिध्दी- दि. 6 एप्रिल
नामनिर्देशन पत्रांची माघार – दि. 6 ते 20 एप्रिल
अंतीम उमेदवारांची यादी प्रसिध्दी – दि. 21 एप्रिल
प्रत्यक्ष मतदान – दि. 28 आणि 30 एप्रिल
मतमोजणी – दि. 30 एप्रिल