जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात अपघाताची मालिका कुठल्याही परिस्थितीत थांबायचे नाव घेत नाही आहे. तर नुकतेच पाचोर्याकडून जळगावकडे भरधाव वेगाने येणार्या कारने पुढे चालत असलेल्या दुचाकीला ओव्हटेक करीत होता. ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार रमेश मदन राठोड (वय-45, रा. रामदेववाडी) यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास रामदेववाडीजवळील टेकडीजवळ घडली. कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी येथे रमेश राठोड हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. शेती करुन ते आपल्या कुटुंबियांचा उदनिर्वाह करीत होते. मंगळवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास ते दुचाकीने जळगावकडे येत होते. याचवेळी पाचोर्याकडून (एमएच 19 डीव्ही 7513) क्रमांकाची कार भरधाव वेगाने येत होती. कारचालक दुचाकीस्वाराला ओव्हरटेक करीत होता. ओव्हरटेक करण्याच्या नादात कारचालकाने दुचाकीस्वाराला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात रमेश राठोड हे गंभीररित्या जखमी होवून बेशुद्ध झाले. त्यांना लागलीच ग्रामस्थांनी रुग्णालयात हलवित असतांना रस्त्यातच त्यांनी प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व तीन विवाहित मुली असा परिवार आहे.
भरधाव कारने दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच एमआडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रदीप पाटील व स्वप्निल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत. कारचालकासह कार ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणण्यात आले.