मुंबई : वृत्तसंस्था
शिंदे गटाचे मंत्री असलेले दादा भुसे यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याने विरोधकांनी आज वातावरण चांगलंच तापवलं. संतप्त अजित पवारांनी हा उल्लेख रेकॉर्डवरुन काढून टाकण्याची आणि दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली. दादा भुसे विधानसभेमध्ये संजय राऊतांसह ठाकरे गटावर टीका करत होते. संजय राऊत यांनी दादा भुसेंवर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले होते. त्याला उत्तर देताना दादा भुसे राऊतांवर टीका करताना म्हणाले, “आम्हाला गद्दार म्हणणारे आमच्या मतांवर निवडून येणारे महागद्दार यांनी ट्वीट करुन लूट केल्याचा आरोप माझ्यावर केला आहे. कोणत्याही माध्यमातून या ट्वीटची चौकशी करावी.
दादा भुसे पुढे म्हणाले, “या प्रकरणात मी दोषी आढळलो तर आमदारकीचा राजीनामा देईन आणि राजकारणातून निवृत्त होईन. ह्यात काही खोटे आढळले तर महागद्दार, सामना संपादकांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा. हे भाकरी मातोश्रीची खातात आणि मातोश्री शरद पवारांची करतात.” दादा भुसे यांच्या याच विधानावर आक्षेप घेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. त्याचबरोबर शरद पवार यांचं नाव रेकॉर्डवरुन काढून टाकण्याची मागणीही पवारांनी केली आहे. अजित पवार म्हणाले, “दादा भुसे, तुम्हाला जे बोलायचं ते बोला. पण कारण नसताना पवार साहेबांचं नाव का घेतलं. माझी मागणी आहे, पवार साहेबांचं नाव रेकॉर्डवरुन काढून टाका.”
दादा भुसेंनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केल्याचा दावाही अजित पवारांनी केला आहे. पवार म्हणाले, “मंत्री दादा भुसे यांनी भूमिका मांडताना पवारसाहेबांचं नाव घेण्याची गरज नव्हती. शरद पवारांचा एकेरी उल्लेख त्यांनी केला आहे. तुमचे शब्द मागे घ्या आणि दिलगिरी व्यक्त करा. “