जळगाव : प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातून मुक्ताईनगर मार्गाने दिल्लीतून पुणे येथे बंदी असलेला गुटखा वाहतूक करताना पहूर ते जामनेर रस्त्यावर नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक यांच्या पथकाने सोमवारी पहाटे रंगेहाथ पकडला. यात मुद्देमालासह साठ लाख ऐंशी हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पहूर पोलिसांत दिल्लीतील मालकासह तीनजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालवाहतूक कंटेनरमधून (क्र. एचआर ४७ डी ९८५६) गुटख्याची वाहतूक पुणे व मुंबई येथील | व्यापाऱ्याकडे केली जात असल्याची माहिती पोलिस महानिरीक्षकांच्या पथकातील पोलिस निरीक्षक बापू, रोहम, सहायक फौजदार रवींद्र ईश्वर शिलावट, बशीर गुलाब तडवी, पोलिस नाईक प्रमोद सोनू मंडलिक, मनोज अशोक दुसाने, पोलिस शिपाई नारायण कचरू लोहरे यांना मिळाली. त्यांनी ही माहिती पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांना दिली. त्यानुसार सहायक फौजदार रवींद्र देशमुख व ईश्वर कोकणे हे पथकासोबत सोनाळा फाट्यावर सोमवारी पहाटे दबा धरून होते. वाहन येताच पथकाने चालकाची चौकशी केली असता गुटखा वाहतूक होत असल्याचे चौकशीत उघड झाले.
वाहन ताब्यात घेऊन पहूर पोलिस स्टेशनला जमा करण्यात आले. बशीर तडवी यांच्या फिर्यादीवरून व्यापारी राजू भाटिया (४५, दिल्ली), चालक शराफत अली हसन मोहम्मद (३०, चहलका, ता. तावडू, हरयाणा), मॅनेजर गोलू (४४) नाव पूर्ण माहिती नाही, चालक इम्रान खान शहाबुद्दीन (५०, हरयाणा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.