जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील निमखेडी शिवारात घरासमोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर खेळत असलेल्या पाच वर्षीय चिमुकलीला त्याठिकाणी लोंबकळणार्या विद्युत ताराचा स्पर्श होवून विजेचा जोरदार धक्का बसल्याने धनवी महेंद्र बाविस्कर (रा. दत्त मंदिर निमखेडी शिवार) हीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. चिमुकलीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबियांनी रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला होता.
हवामानतील बदलामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वादळी वारा सुरू आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये विद्युत तारा तुटलेल्या असून तर काही ठिकाणी तारा लोंबकलेल्या आहेत. शहरातील निमखेडी भागात देखील विद्युत तारा वादळी वार्यामुळे लोंबकलेल्या आहे. याच परिसरात रहणारी पाच वर्षीय धनवी ही सोमवारी गल्लीतील लहान मुलांसोबत खेळत होती. ही लहान मुले खेळता खेळता त्यांच्या गल्लीत सावलीत उभ्या असलेल्या ट्रॅक्टवर चढली.
ट्रॅक्टवर खेळत असतांना त्याठिकाणी लोंबकलेल्या विद्युत तारांना धनवीचा स्पर्श झाल्याने तिला विजेचा जोरदार धक्का लागल्याने ती गंभीर जखमी झाली. काही वेळातच धनवीची आई घराबाहेर आल्या असता, त्यांना धनवीला विजेचा धक्का लागल्याचे दिसून आले. त्यांनी लागलीच परिसरातील नागरिकांच्या मदतीने धनवीला तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.
विजेच्या जोरदार धक्क्यामुळे चिमुली धनवी गंभीर जखमी झाली होती. तीला रुग्णालयात आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन महाजन यांनी तीची तपासणी केली. तपासणी केल्यानंतर चिमुकलीचा मयत घोषीत केले. डॉक्टरांनी मयत घोषीत करताच तिच्या आई-वडीलांसह नातेवाईकांनी यांनी प्रचंड आक्रोश केला होता. चिमुकली धनवीचे वडील महेंद्र छगन बाविस्कर हे हातमजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात तर घरी आई, आजी आणि एक बहीण असा परिवार आहे. चिमुकलीच्या दुदैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.