सोलापूर : वृत्तसंस्था
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सोलापूरमधील बार्शीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन अत्याचार पीडित मुलीची ओळख जाहीर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पॉक्सो कलम 23, ज्युवेनाईल जस्टिस अॅक्ट कलम 74 आणि IPC 228 A नुसार बार्शी शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
बार्शीत 5 मार्च रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे दुसऱ्या दिवशी दोन आरोपींनी अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पीडित मुलगी ही गंभीर जखमी झाली. त्यानंतर पोलिसांनी अक्षय माने, नामदेव दळवी या दोन्ही आरोपींना अटक केली. मात्र या संदर्भात ट्वीट करताना संजय राऊत यांनी आरोपी मोकाट असल्याचं सांगितलं. तसेच पीडित मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला फोटो देखील ट्वीट केला होता. यामुळे अल्पवयीन अत्याचार पीडित मुलीची ओळख जाहीर झाली अशी तक्रार एका व्यक्तीने बार्शी पोलिसात दिली. त्या तक्रारीवरुन काल रविवारी (19 मार्च) रात्री अकरा वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान संजय राऊत यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यातील कलमांमध्ये सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे आधी 41 ब प्रमाणे नोटीस दिली जाईल. राऊत यांना थेट अटक होणार नाही. त्यांच्या उत्तरानंतर पुढील कारवाई होईल अशी माहिती आहे.
संजय राऊत यांच्या ट्वीटनंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. या प्रकरणात दोन्ही आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करत अटक झाली. आताही आरोपी जेलमध्ये आहेत ही वस्तुस्थिती असताना का तुम्ही खोटी माहिती देताय? सगळ्यात महत्वाचं तुम्ही पीडितेचा फोटो कसा काय व्हायरल केलात?” असे सवाल चित्रा वाघा यांनी संजय राऊत यांना विचारला.
या प्रकरणात बार्शी शहर आणि तालुका पोलीस ठाण्याच्या चार पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक, दोन पोलीस अंमलदार अशा चौघांना निलंबित करण्यात आलं आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी ही कारवाई केली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोन आरोपींवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु या आरोपींना तात्काळ अटक करणे गरजंचे होते. मात्र पोलिसांनी अटक न केल्याने दुसऱ्या दिवशी या आरोपींनी पीडित अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर जीवघेणा हल्ला केला, ज्यात ती गंभीर जखमी झाली. पोलिसांनी आरोपींना तात्काळ जर अटक केली असती तर कदाचित हा हल्ला झाला नसता अशी टीका सर्वत्र होऊ लागली. त्यामुळे बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, पोलीस अंमलदार राजेंद्र मंगरुळे आणि बार्शी शहर पोलिस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सारिका गटकुल, पोलीस अंमलदार अरुण माळी अशा चार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना कर्तव्यात कसूर करणे, आरोपीना अटक करण्यात विलंब करणे या कारणांमुळे त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.