जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरात गेल्या काही दिवसापासून अनेक घरफोडीसह चोऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून नुकतेच शहरातील रिंगरोडवरील बँक ऑफ बडोदाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न एका चोरट्याने केला. हा प्रयत्न अयशस्वी झाल्याने चोरट्याला खाली हात परतावे लागले. हा संपूर्ण प्रकार एटीएममधील कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून ही घटना गुरुवारी सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा जिल्हा पेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद आहे.
रिंगरोड येथे बँक ऑफ बडोदा ची शाखा असून बाजूलाच एटीएम आहे. गुरुवारी सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास बँकेचे ग्राहक विष्णू खैरे हे एटीएममध्ये आल्यावर त्यांना एटीएम मशीनचे काही भाग अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. ही बाब त्यांनी लागलीच बँक मॅनेजर पवन मोंगड यांना सांगितली. मोंगड यांनी एटीएम गाठून पाहणी केली. नंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात बुधवारी रात्री ११.२० वाजता तोंडाला रूमाल बांधलेला एक चोरटा एटीएमचे फ्रंट डोअर तोडताना आणि की पॅड बाजूला फेकताना दिसून आला. मात्र, एटीएमचे सेफ वॉल्ट न उघडता आल्यामुळे चोरट्याला खाली हात परतावे लागले.