अमळनेर : प्रतिनिधी
अमळनेर पोलीस स्थानकाचा पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पदभार घेतल्यापासून अवघ्या तीन महिन्यांतच शहरात ‘गुन्हेगार वॉश आउट’ मोहीम राबवण्यात येत आहे. तिसरी एमपीडीए कारवाई करण्यात आली असून, विशाल सोनवणे (२७) याला स्थानबद्ध करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले आहे.
दादू धोबी, शुभम देशमुख या सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कारवाई केल्यानंतर तब्बल १३ गुन्हे दाखल असलेल्या विशाल सोनवणे याच्यावरही एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार व अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी गुन्हेगार ‘वॉश आउट’ मोहीम राबवणे सुरू केले. डीवायएसपी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी मोटरसायकल चोरी, विनयभंग, जबरी चोरी, खंडणी मागणे, धारदार शस आणि मारहाण करून दुखापत करणे, जातीयवादी गुन्हे करणे, दंगल माजवून दहशत घालणे, फायटर पिस्टल लावून जबरी चोरी, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याचे तीन गुन्हे विशाल सोनवणे याच्याविरुद्ध दाखल आहेत.
एलसीबी पोलीस, पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, अनिल भुसारे, पोलीस उपनिरीक्षक अक्षता इंगळे, हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील, पोलीस नाईक शरद पाटील, दीपक माळी, सिद्धान्त शिसोदे, संजय पाटील, मधुकर पाटील, सुनील पाटील, हितेश चिंचोरे, मिलिंद भामरे यांनी विशाल विजय सोनवणे (२७, फरशी रोड) याला ताब्यात घेऊन त्याच्यावर एमपीडीए कारवाई केली.