पुण्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी तरुणाला विशेष शाखेने (स्पेशल सेल) पकडले. तरुणाकडून बनावट भारतीय पारपत्र जप्त करण्यात आले आहे.
महम्मद अमान अन्सारी (वय २२) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अन्सारीविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात फसवणूक, बनावट शासकीय कागदपत्रे तयार करणे, तसेच विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम १४ आणि पारपत्र कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष शाखेतील परकीय नागरिक पडताळणी विभागातील पोलीस कर्मचारी केदार जाधव यांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अन्सारी पाकिस्तानी नागरिक असून तो शहरात बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती विशेष शाखेला मिळाली होती. त्यानंतर त्याला भवानी पेठेतील चुडामण तालीम चौक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे भारतीय पारपत्र आढळून आले. अन्सारीने बनावट कागपत्रांद्वारे भारतीय पारपत्र मिळवले आहे. अन्सारीने बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. अन्सारीचा बेकायदा वास्तव्य करण्यामागचा हेतू काय होता, तसेच तो दहशतवादी कारवाईमध्ये सामील आहे का? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. खडक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश तटकरे तपास करत आहेत.