जळगाव : प्रतिनिधी
तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या प्रकरणात आरोपी गणेश सखाराम बांगर (३२, रा. मालेगाव) याला मंगळवारी जिल्हा सत्र न्यायाधीश डी. वाय. काळे यांनी दोन वर्षे १० महिने कारावास व दंडाची शिक्षा सुनावली.
१९ मे २०२० रोजी पीडित मुलगी ही आई-वडील व भावासोबत मुंबई येथून त्यांच्या मूळगावी अकोला येथे जात होती. कालंका माता मंदिरापुढे जेवण वाटप सुरू असल्यामुळे पीडितासह तिचे कुटुंब जेवण करून सावलीत बसले होते. तेव्हा गणेश बांगर हा तेथे आला. मीसुद्धा अकोला येथे जात असल्याचे सांगत पीडिता व तिच्या भावाला दुचाकीवर घेऊन भुसावळकडे निघाला. मात्र, रस्त्यावर पोलिस उभे असताना बांगर याने पीडितेच्या भावाला रस्त्यात उतरवून पीडितेला घेऊन पसार झाला होता. यानंतर भावाच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली होती.
या खटल्यात सरकारपक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात अल्पवयीन मुलगी, तिचा भाऊ, पंच आणि तपासणी अधिकारी गजानन राठोड, तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या. न्यायालयाने आरोपी बांगर याला दोषी धरून शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड. प्रदीप महाजन यांनी कामकाज पाहिले.