जळगाव : प्रतिनिधी
भुसावळ शहरात दरोड्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत, विनयभंग तसेच घरफोडीसारख्या गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगार जितेंद्र उर्फ मोनू रामदास कोल्हे (३४, रा. अमरनाथ नगर, भुसावळ) याला एमपीडीए कायद्यांतर्गत पुण्यातील येरवडा कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या आदेशानंतर ही कारवाई झाली.
जितेंद्र कोल्हे याच्याविरूध्द भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात ०१ दरोड्याचा प्रयत्न, ०१ दरोड्याची तयारी, ०२ गंभीर दुखापत तसेच ०१ विनयभंग व ०२ घरफोडी असे एकूण ०७ गुन्हे व ०५ अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये त्याला वेळोवेळी अटक झाल्यानंतर तो न्यायालयातून जामिनावर सुटताच पुन्हा गुन्हेगारी करीत होता. तसेच दहशत निर्माण करत होता. अखेर भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी मागील महिन्यात त्याच्याविरुध्द एमपीडीएची कारवाईसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची पडताळणी करून तो जिल्हाधिकारी यांना पाठविला होता. बुधवारी जिल्हाधिकारी यांनी प्रस्तावाला मंजूरी देवून एमपीडीए कारवाईचे आदेश केले. एलसीबीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, राहुल गायकवाड, हरिष भोये, युनूस शेख इब्राहिम, सुनील दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील, गणेश मु- हे, आत्माराम भालेराव, योगश महाजन यांच्या पथकाने बुधवारी कोल्हे यास ताब्यात घेतले.