मुंबई : वृत्तसंस्था
राज्यांमध्ये सध्या जोरदार अवकाळी पाऊस कोसळत आहे. तसेच महाराष्ट्रात देखील सध्या अवकाळी पावसाचा जोरदार धुमाकूळ सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे.
मुंबईसह, पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळला आहे. रब्बी पिकांची काढणी सुरु असल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे. तसेच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा आणि गहू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
भारतीय हवामान खात्याने मंगळवारी सकाळी पुढील ३-४ तासांत मुंबई, पुणे, अहमदनगर जिल्ह्यांत वादळ आणि पावसाचा अंदाज वर्तवला होता. यासोबतच हवामान खात्याने लोकांना बाहेर पडताना खबरदारी घेण्यास सांगितले होते. IMD ने काही वेळा 50-60 किमी प्रतितास वेगाने हलका पाऊस आणि वादळी वारे येण्याची शक्यता असलेल्या अंशतः ढगाळ आकाशाचा अंदाज वर्तवला आहे.
भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडत आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या काही भागात जोरदार वारा आणि गडगडाटासह वीजपुरवठा खंडित झाला.
ऐन रब्बी पिकांच्या काढणीवेळी आलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जळगाव आणि धुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. अवकाळी पावसामुळे केळी, गहू, हरभरा, मका या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, दक्षिण कोकण ते मध्य छत्तीसगढपर्यंत वाहणाऱ्या वाऱ्याच्या प्रभावामुळे 6-8 मार्च दरम्यान मध्य भारतात, 6-9 मार्च दरम्यान महाराष्ट्र आणि 6-7 मार्च दरम्यान राजस्थानमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.