जळगाव : प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील पाथरी येथे मोठ्या भावाच्या घराचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी राहुल छगन माळी (वय-35) या लहान भावाने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना पाथरी गावात सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेली माहिती अशी कि, जळगाव तालुक्यातील पाथरी येथे राहुल हा आई-वडील व भावांसह वास्तव्यास असून तो हातमजुरी करून कुटूंबियांना हातभार लावत होता. त्याच्या घराच्या शेजारीच मोठा भाऊ राजू याच्या घराचे बांधकाम सुरू होते. सोमवारी दुपारी या घरामध्ये राहुल याने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. काही वेळानंतर मोठा भाऊ राजू हा बांधकाम सुरू असलेल्या घरामध्ये आल्यावर त्याला लहान भाऊ गळफास घेतलेला दिसताच त्याने एकच आक्रोश केला. यानंतर कुटूंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून तो जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला.
त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास अल्ताफ पठाण आणि शांताराम पाटील करीत आहेत.