नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील गुन्हेगारी दिवसेदिवस वाढत चाललेली असतांना एक धक्कादायक घटना विलासपूरमध्ये घडली आहे. पोलिसांनी बनावट नोटांच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश करण्यासाठी एका तरुणाच्या घरी छापेमारी केली. तिथे त्यांना बनावट नोटा छापणाऱ्या नोटांसह एका महिलेचे 6 तुकडे करण्यात आलेला मृतदेह आढळला. ही डेडबॉडी पाण्याच्या टाकीत ठेवण्यात आली होती. आरोपीने सांगितले, त्याने 2 महिन्यांपूर्वी आपल्या पत्नीची हत्या केली होती. त्यानंतर तिचे तुकडे करून ते टाकीत लपवले होते. चारित्र्याच्या संशयावरून ही हत्या केल्याचा दावा आरोपीने केला.
पोलिस आरोपीच्या घरी धाड टाकण्यासाठी पोहोचले तेव्हा तिथे सर्वत्र दुर्गंध पसरल्याचे आढळले. त्यामुळे त्यांनी सिटेंक्सच्या टाकीचे झाकण उघडले असता त्यांचे डोळेच पांढरे झाले. टाकीत महिलेचे तुकडे आढळले. आरोपी पवनने सांगितले की, हा मृतदेह त्याची पत्नी सती साहूचा आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकून चौकशी सुरू केली आहे. सकरी टीआय सागर पाठक यांच्या माहितीनुसार, पोलिसांना उसलापूर रेल्वे स्थानकामागे राहणारा पवन सिंह ठाकूर बनावट नोटांचा अवैध व्यापार करत असल्याची खबर मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या उसलापूर ओव्हरब्रिजजवळ बनावट नोटांसह मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याच्या घराची झडती घेण्यात आली असता, तिथे् 500 व 200 रुपयांच्या बनावट नोटांचे बंडल आढळले.
चौकशीत आरोपी पवन सिंहने सांगितले की, तो पत्नी व 2 मुलांसह राहत होता. त्याची मोठी मुलगी 5, तर मुलगा 3 वर्षांचा आहे. तो एनटीपी कर्मचारी निर्दोष एक्का यांच्या घरी भाड्याने राहतो. सीसीटीव्ही कॅमेरा ऑपरेटिंग व रिपेयरिंगचे काम करत होता. त्याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला होता. त्यामुळे गत 5 जानेवारी रोजी त्याने तिची हत्या केली. आरोपी पवन सिंह ठाकूर पत्नी सती साहूशी लव्ह मॅरेज केले होते. त्यामुळे मुलीच्या माहेरच्यांनी मुलीसोबतचे संबंध तोडले होते. घटनेच्या 2 महिन्यांनंतरही महिलेच्या माहेरच्यांनी तिचा शोध घेतला नाही. एवढेच नाही तर आसपासच्या लोकांनाही या घटनेची कोणतीही खबरबात मिळाली नाही. आरोपीने कामाचे कारण सांगून मुलांना गावी आपल्या आई-वडिलांकडे पाठवले होते.पोलिस चौकशीत असे आढळले की, पवन सिंहची पत्नी सती साहू मुंगेलीच्या दाऊपारा येथील होती. जवळपास 10 वर्षांपूर्वी त्यांची मैत्री झोलाी. लग्नानंतर दोघेही उसलापूर येथे राहत होते.