जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उपसा सुरुच आहे. जळगाव शहराजवळ असलेले आव्हाणे भागात बुधवारी दुपारी २ वाजता वाळू भरण्यासाठी जात असलेल्या ट्रॅक्टरने आव्हाणे रस्त्यालगत असलेल्या काळभैरव मंदिराजवळ दुचाकीवर आव्हाण्याहून जळगावकडे जात असलेल्या माय-लेकाला उडविल्याची घटना घडली. यामध्ये मुलाला जबर मार बसला असून, आईच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांकडून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत ट्रॅक्टरची तोडफोड करण्यात आली.
गेल्या काही महिन्यांपासून आव्हाणे येथील गिरणा नदीपात्रातून तुफान वाळू उपसा सुरु आहे. पोलिस प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही होताना दिसत नसून, वाळू माफियांना जणू मोकळे रानच करून दिले आहे. त्यातच वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व डंपर देखील मोठ्या भरधाव वेगाने वाहतूक करतात. त्यामुळे इतर वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे. बुधवारी दुपारी २ वाजता आव्हाणे येथून प्रज्वल प्रमोद चौधरी (वय २३, रा. आव्हाणे) हा युवक आपल्या आई उज्ज्वला प्रमोद चौधरी यांच्यासोबत दुचाकीने जळगावला येत होता. आव्हाणे रस्त्यावरील काळभैरव मंदिराजवळ जळगावकडून आव्हाण्याकडे वाळू भरण्यासाठी भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. त्यात दोन्ही माय-लेक दुचाकीसह रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. त्यात प्रज्वलच्या हातासह पायाला गंभीर दुखापत झाली. तर उज्ज्वला चौधरी यांनाही डोक्याला मार लागला. त्याचवेळी गावातील रिक्षा जात असल्याने, रिक्षा चालकाने तत्काळ दोन्ही जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.