नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (यूपी बोर्ड) इयत्ता १० आणि १२ वीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी विविध परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा देत आहेत. पण बरेलीतील एका परीक्षा केंद्रावर चक्क एक माजी आमदार इयत्ता १२ वीची परीक्षा देण्यासाठी पोहोचला आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
लॅमिनेशन केलेलं हॉल तिकीट, पाण्याची बॉटल आणि रायटिंग पॅड घेऊन ५१ वर्षीय एक व्यक्ती इयत्ता १२ वीच्या परीक्षेला पोहोचला. या व्यक्तीनं परीक्षा केंद्रावरील सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. कारण ती व्यक्ती दुसरं तिसरं कुणी नसून विभागातील माजी आमदार राजेश मिश्रा उर्फ पप्पू भरतौल होते. राजेश मिश्रा हे भाजपाचे माजी आमदार आहेत.
राजेश मिश्रा यांनी १६ फेब्रुवारी रोजी इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर पोहोचले. यावेळी परीक्षा केंद्रावरील विद्यार्थी आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या उमेदवाराला पाहून आश्चर्यचकीत झाले. वयाच्या या टप्प्यात शिक्षणाला महत्व दिल्याबद्दल अनेकांनी त्यांचं कौतुकही केलं. “परीक्षेसाठी आलेले विद्यार्थी मला पाहून आश्चर्यचकीत झाले होते. पण त्यांच्या विभागातील एक राजकीय नेता त्यांच्यासोबत परीक्षेला बसतोय हे पाहून ते आनंदी होते”, असं राजेश मिश्रा म्हणाले. राजेश मिश्रा २०१७ साली उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यांनी बरेलीच्या बिथरी चैनपूर विधानसभा मतदार संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. पण गेल्या निवडणुकीत भाजपानं मिश्रा यांना तिकीट दिलं नव्हतं.
आपल्या राजकीय करिअरच्या व्यग्र कार्यक्रमातून वेळ काढून माजी आमदार मिश्रा यांनी आपलं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी इयत्ता १२ ची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार शिक्षण पूर्ण केल्यानं त्यांना आपल्या युवा मतदारांशी चांगल्या पद्धतीनं संवाद साधता येईल आणि यामागे एक मोठा उद्देश देखील आहे, असंही ते म्हणाले. मिश्रा म्हणाले की, एक आमदार म्हणून काम करत असताना मला अनेक गोष्टी प्रकर्षानं जाणवल्या की जे आर्थिक पातळीवर कमकुवत आहेत. अशांना न्याय मिळत नाही. कारण ते चांगल्या वकिलाचा खर्च करु शकत नाही. अशा लोकांची मदत करण्यासाठी कायद्याचा अभ्यास करण्याचा विचार आहे आणि एलएलबी करण्यासाठी इयत्ता १२ वी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे.