पाचोरा : प्रतिनिधी
आयुष्यातल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्यासोबत असणाऱ्या सहचारिणीचा मृत्यू झाल्याचे समजताच पतीनेही प्राण सोडल्याची हृदद्रावक घटना जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे घडली आहे. सिंधू दत्तात्रय वाणी (वय 75) आणि दत्तात्रय गणपत वाणी (वय 85) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
सातगाव डोंगरीमध्ये दत्तात्रय वाणी यांचे कुटुंब रहायचे. त्यांची पत्नी सिंधू व ते दोघेही अनेक दिवसांपासून आजारी होते. मात्र, दोघांच्याही प्रकृतीमध्ये म्हणावी तशी सुधारणा नव्हती. त्यातच 21 फेब्रुवारी रोजी सिंधू यांचा मृत्यू झाला. खरे तर घरातल्या व्यक्तींनी ही बातमी दत्तात्रय यांना कळू दिली नव्हती.
मात्र, आईच्या निधनानंतर त्यांच्या मुलींनी टाहो फोडला. तेव्हा दत्तात्रय यांना आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजले. या धक्क्यामुळे त्यांची वाचाच गेली. त्यांनी बोलणे सोडले. पत्नीच्या निधनानंतर दहा तासांनी दत्तात्रय यांनीही प्राण सोडले. त्यामुळे दोघांचीही एकाचवेळी अंत्ययात्रा काढण्यात आली. वाणी पती-पत्नी यांच्या मागे कुटुंबात तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. पती-पत्नीचे नाते, त्यातले प्रेम असेच असते. कधी समजते, तर कधी नाही. याचीच प्रचिती जळगाव जिल्ह्यातल्या या लहानशा गावात आली. या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.