जळगाव : प्रतिनिधी
कमरेला गावठी पिस्तूल लावून वरणगाव शहरात दहशत माजविणाऱ्या उदय राजू उजलेकर (२२, रा. आंबेडकर नगर, वरणगाव) या गुन्हेगाराला मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने पकडले. त्याच्यावर कारवाई करून पोलिसांनी गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूस जप्त केले असून, याप्रकरणी वरणगाव पोलिसात आर्म अॅक्टनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
उदय उजलेकर हा स्वत:च्या कमरेला गावठी पिस्तूल लावून वरणगाव शहरात दहशत माजवित असल्याची माहिती मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली होती. त्यांनी त्वरित स्वतंत्र पथक तयार करून कारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार पथकाने वरणगाव गाठून उजलेकर याचा शोध सुरू केला. अखेर त्याला पारस हॉटेलजवळ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतूस मिळून आले आहेत. ही कारवाई सहायक फौजदार युनूस शेख इब्राहीम, दीपक पाटील, महेश महाजन, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, रवींद्र पाटील, मुरलीधर बारी यांच्या पथकाने केली आहे.