नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरु असून यामध्ये मोबाईलसह दुचाकीची चोरी होण्याच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. अशीच एक घटना नाशिकरोड परिसरातील परिक्षा केंद्रावर पेपरसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केल्याची घडली आहे.
चोरट्यांनी परिक्षा सुरु असतांना दहा महागडे मोबाईल चोरुन नेले. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी सुमारे ५३ हजार रूपये किमतीचे जुने वापरते दहा मोबाईल चोरी गेल्याप्रकरणी एकत्रीत गुन्हा दाखल केला आहे. आशिष किरण आहिरे (रा.श्रमिकनगर,जेलरोड) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बारावीची परिक्षा सर्वत्र सुरू झाली आहे. मंगळवारी (दि.२१) इंग्रजीचा पहिला पेपर होता. नाशिकरोड भागातील के.जी.मेहता,बिटको कॉलेज व जयरामभाई हायस्कूल या परिक्षा केंद्रावर ही घटना घडली. पेपरला बसण्यापूर्वी सर्वच विद्यार्थ्यांनी सोबत आणलेल्या वस्तू आणि बॅगा जमा करण्यात आल्या होत्या.
वेगवेगळय़ा ठिकाणच्या परिक्षार्थींच्या वर्गा बाहेर ठेवलेल्या बॅगांमधून चोरट्यांनी हात की सफाई केली असून तब्बल दहाहून अधिक महागडे मोबाईल लांबविण्यात आले आहेत. परिक्षाकाळात चोरटे महाविद्यालय आवारात आलेच कसे असा प्रश्न उपस्थित होत असून परिक्षास्थळावरील सीसीटिव्ही यंत्रणेच्या आधारे भामट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भामरे करीत आहे.