अमळनेर : प्रतिनिधी
पारोळा तहसील कार्यालयातील पुरवठा लिपिकांची कॉलर पकडून गोंधळ घातल्याने, अमळनेर जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला एक वर्षांची शिक्षा ठोठावली. २ मार्च २०१६ रोजी लिपिक सुदाम भालेराव हे कार्यालयीन कामकाज करत होते. त्यावेळी आरोपी अनिल गंगाराम पाटील (रा.सुमठाणे, ता.पारोळा) याने दुपारी दीड वाजेच्या सुमारास लिपिक भालेराव यांना, माझे काम आजच्या आज का केले नाही म्हणत गोंधळ घातला.
एसीबीकडे खोटी तक्रार करून तुला अडकवतो असे म्हणत त्याने लिपिकाच्या टेबलावरील स्वस्त धान्य दुकानांचे रजिस्टर खाली फेकले. तसेच भालेराव यांच्या शर्टाची कॉलर पकडली. त्यामुळे कलम ३५३ व ५०६ प्रमाणे अनिल गंगाराम पाटील याच्याविरोधात, सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सरकारी वकील किशोर बागुल यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यानुसार अमळनेर न्यायालयाने शिक्षा सुनावली.