जळगाव : प्रतिनिधी
मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी न्यायालयात आलेल्या मनोहर सुरडकर यांच्यासोबतच्या फरार आरोपीला मंगळवारी कल्याण येथील रेल्वे स्टेशनवर रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी कट्ट्यासह चार जिवंत काडतूस देखील हस्तगत केली आहेत. त्या आरोपीचे नाव सुरेश रवी इंधाटे (वय २८, रा. पंचशिलनगर, भुसावळ) असून, त्याला रेल्वे पोलिसांनी पकडले आहे.
मिळालेली माहिती अशी कि, डोळ्यादेखत आपल्या मुलाला गोळ्या झाडून धम्मप्रिय मनोहर सुरडकर याचा निर्घृण खून केल्याची घटना नशिराबाद उड्डाणपुलाखाली घडली होती. त्याचा बदला घेण्यासाठी मनोहर सुरडकर यांनी संशयित मारेकरी समीर उर्फ भांजा शेख जाकीर व रेहानुद्दीन नईमोद्दीन (दोघं रा. पंचशिलनगर) यांना न्यायालयातच संपविण्याचा कट सुरेश इंधाटे याच्यासोबत रचला होता. त्यानुसार सोमवारी ते दोघं बुरखा घालून न्यायालयाच्या परिसरात आले असता, त्यांचा कट शिजण्यापूर्वीच पोलिसांनी उधळून लावला होता. दरम्यान, संशयित सुरेश इंधाटे हा कल्याण रेल्वे स्थानकावर उतरताच त्याला अटक केली.