जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील पाचोरा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यातील जामिनावर असलेल्या अरुण भगवान गवळी या आरोपीला सोमवारी पोलिसांनी जिल्हा न्यायालयात हजर केले असता, हा आरोपी लघुशंकेचा बहाणा करत पसार झाला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी अरुण गवळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुम्मी (ता. जि. बुलढाणा) येथून पुन्हा अटक केली आहे. पाचोरा पोलिस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी दाखल असलेल्या बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अरुण भगवान गवळी (वय २२, रा. गुम्मी, ता. जि. बुलढाणा) याला पोलिसांनी अटक केली होती.
कोरोनाकाळापासून तो जामिनावर बाहेर होता. सोमवारी त्याला ताब्यात घेत पोलीस जिल्हा न्यायालयासमोर हजर केले. प्राथमिक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर दुपारी ४.४५ वाजता अरुण गवळी याने पोलिसांना लघुशंकेसाठी जात असल्याचे सांगितले. त्यावेळी पोलीस हवालदार विजय पाटील हे त्याला लघुशंकेसाठी घेऊन गेले. त्याचवेळी संबंधित पोलिस कर्मचारी गुन्ह्याच्या केस वॉच यांना गुन्ह्यातील डी.एन.ए. अहवाल प्राप्त नसल्याबाबत कळवत होते. मात्र, याचवेळी पोलिसांची नजर चुकवून अरुण गवळी याने पळ काढला. पोलिसांनी यावेळी परिसरात संबंधित आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो आढळला नाही. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून पथक पाठविण्यात आले होते. मंगळवारी अरुण गवळी राहत असलेल्या गुम्मी गावातील त्याच्या घरातून त्याला पुन्हा ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासासाठी त्याला जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.