प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : आणि पाणी या दोन शब्दांचा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध नेहमीच पहायला मिळतो. एरवी पाण्यामुळे शितलता प्राप्त होते परंतु इकडे मात्र पाणी प्रश्नावरून अनेकदा वातावरण तप्त झाल्याचा अनुभव धरणगावकर जनता नेहमीच घेत असते. मात्र मागील काही दिवसांपासून ४ ते ५ दिवसांआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे धरणगावकर जनता सुखद अनुभव घेतेय.
याबाबत सविस्तर माहिती अशी की दोन महिन्यांपूर्वी शहरात १५ ते २० दिवसात पाणी पुरवठा होत होता. घरातील अगदी शेवटच्या भांड्यातील पाणी संपेपर्यंत काटकसरीने पाण्याचा वापर करावा लागत होता. काही दिवसांपासून मात्र हाच पाणीपुरवठा ४ ते ५ दिवसांच्या आत होतोय. पाण्याची साठवण क्षमता असलेल्या भांडयांपैकी निम्मे भांडी सुध्दा खाली होत नाही तोवर नळाला येणारे पाणी आल्याचे पाहून धरणगाव शहरातील जनता एक वेगळाच आनंद अनुभवत आहे. दोन महिन्यांपूर्वी होणारा अनियमित पाणीपुरवठा आणि सध्याचा नियमित पाणीपुरवठा याची कारणे काय आहेत? याची कारणे समजून घेण्यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी व मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
निलेश चौधरी (लोकनियुक्त नगराध्यक्ष)
धरणगाव शहराला ज्या ठिकाणाहून पाणीपुरवठा केला जातो त्याठिकाणी गाळ आणि इतर तांत्रिक कारणांमुळे पंपामध्ये वारंवार बिघाड होत असल्यामुळे पाणीपुरवठा करण्यास विलंब होत होता. दोन पंप असून सुध्दा वारंवार पंप खराब होत असल्याने एकाच पंपावर सर्व लोड होता याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सर्व परिस्थिती ची कल्पना दिली असता त्यांनी तात्काळ जिल्हा नियोजन समितीतून ६६ लाख रुपयांची तरतूद करून १३५ एचपी चे २ नवीन पंप उपलब्ध करून दिलेत. त्यामुळे सध्या ३ पंप सुरू आहेत व एक पंप स्पेअर मध्ये शिल्लक आहे. धावडा आणि पिंप्री या दोन्ही ठिकाणाहून पंप सुरू असल्यामुळे पाण्याच्या टाक्यांची पातळी खाली जात नाही. या कारणास्तव शेवटच्या कनेक्शन ला सुध्दा प्रेशरने पाणीपुरवठा होतोय. पाण्याची टाकी भरलेली असते त्यामुळे रोटेशन लवकर पूर्ण होते. आम्ही सध्या ४ दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहोत. काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास पाणीपुरवठा ५ ते ६ दिवसांआड होईल आणि इथून पुढे पाणी पुरवठा अशाच प्रकारे सुरळीत राहील. हा पाणीपुरवठा नियमित व वेळेवर होण्याचे श्रेय
पालकमंत्री गुलाबराव पाटील, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, धरणगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष निलेश चौधरी उपाध्यक्ष कल्पना महाजन, गटनेते विनय (पप्पू भावे), भागवत चौधरी व सर्व नगरसेवक, तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाते.
जनार्दन पवार (मुख्याधिकारी)
धरणगाव नगर परिषदेमार्फत सध्या धरणगाव शहराला पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे मध्यंतरी जुन्या पंपा मुळे तसेच पाईप लाईन फुटल्यामुळे अडचणी होत्या त्या दूर करण्यात आलेल्या आहेत. पाणी पुरवठा सुरळीत व वेळेवर असल्यामुळे पाणी लवकर पूर्ण होत असेल. आमचं पाणी १ ते १:१५ तासात पूर्ण होतं त्यामुळे आपण १५ मिनिटांचा अवधी कमी केला तरी चालेल असं नागरिकांनी स्वतःहून सांगितले पाहिजे. प्रत्येक नागरिकाने नळांना तोट्या बसवल्या पाहिजेत जेणेकरून पाण्याचा अपव्यय होणार नाही. तसेच सध्या सगळीकडे डेंग्यूची साथ सुरू आहे त्यामुळे पाणी साठवण्याचे ठिकाणे स्वच्छ ठेवावीत तसेच आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळण्यात यावा यामुळे साठवलेल्या पाण्यात डेंगूच्या आळ्या होणार नाहीत असे आवाहन नगरपरिषद प्रशासनामार्फत शहरातील नागरिकांना करण्यात येत आहे.
धरणगाव शहरात सुरू असलेल्या नियमित पाणीपुरवठ्याच्या बाबतीत नागरिकांना विचारले असता नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अशाच प्रकारे जर यापुढे देखील आम्हांला नियमित पाणी मिळाले तर फार उत्तम होईल असा आशावाद अनेक नागरिकांनी व्यक्त केला. पाण्याची समस्या कायमची दूर होईल की त्यात अजून काही अडथळा निर्माण होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.