जळगाव : प्रतिनिधी
आव्हाणे शिवारातील साहिल गाढे या तरुणाची पूजा सुनील चौहान (वय ३५, रा. मीरा रोड, मुंबई) व अन्य एकाने कार व बिझनेस लोन मंजूर करून देण्याच्या नावाखाली २३ लाखांत फसवणूक केली होती. याबाबत १४ फेब्रुवारीला गाढे याच्या तक्रारीवरून सायबर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणी केवळ चार दिवसांत हा गुन्हा उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे.
कार व बिझनेस लोन मंजूर करून देण्याच्या नावाखाली साहिल गाढे या तरुणाची २३ लाखांत फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले असून, तिच्याजवळून १८ लाख ६९ हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, सचिन सोनवणे, दिलीप चिंचोले, स्वाती पाटील, राजेश चौधरी व गौरव पाटील आणि स्थागुशाचे ईश्वर पाटील हे करीत असताना, त्यांना पूजा चौहान ही महिला मुंबईत असल्याची माहिती मिळाली.