धरणगाव : प्रतिनिधी
येथील समस्त कुणबी पाटील पंच मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव २०२३ निमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर तथा दूरदर्शन व टीव्ही स्टार सुरेश होनाजी जाधव यांचा शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
सर्वप्रथम शाहीर सुरेशराव जाधव यांच्या हस्ते कुळवाडी भूषण – मानव प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर शाहीर व त्यांच्या सर्व टीम चे शाल, ग्रंथ आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. शाहीर सुरेशराव जाधव यांनी सुरवातीला जिजाऊ, अहिल्यामाई, सवित्रीमाई, रमाई यांना पोवाड्याच्या माध्यमातून वंदन केले. शिवजन्मापूर्वीचा इतिहास, शिवजन्म एक ऐतिहासिक घटना, शिवराय व त्यांचे साथीदार, स्वराज्याची संकल्पना जिजाऊ व तुकोबाराय हेच खरे शिवरायांचे गुरू हा सर्व प्रवास कथन करतांना मी शिवबाचा सरदार या पोवाड्याच्या माध्यमातून राजेंच्या कार्यकर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास कथन केला. इतिहासातील ज्वलंतपणा, अंगावर शहारे आणणारा पहाडी आवाज, आवाजातील चढउतार, कार्यक्रमासोबत एकरूप झालेली जनता इ. विविध वैशिष्ट्ये सांगता येतील. कार्यक्रमाला राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर, गावातील सुज्ञ नागरिक बंधू भगिनी, युवकांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन समस्त कुणबी पाटील समाज अध्यक्ष व पंच मंडळ तसेच समाज बांधवांनी केले होते. कार्यक्रमाला चंद्रमौळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स धरणगाव यांचे तसेच जगदंबा टेंट हाऊस धरणगाव यांचे अनमोल सहकार्य लाभले.