रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील बक्षीपूर येथील एक महिला वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या अंगणवाडी सेविकेच्या बंद घरातून पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. दुसरीकडे सिहोर येथे रूद्राक्ष घेण्यासाठी गेलेल्या घरमालकांकडेही चोरी झाली. घरी कुणीच नसल्याने किती ऐवज लंपास झाला हे समजू शकले नाही.
मिळालेली माहिती अशी कि, बक्षीपूर येथील अंगणवाडी सेविका चंद्रभागा यशवंत माळी यांचे वडील तुकाराम हरी महाजन यांचे नुकतेच निधन झाले. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी त्या रावेर येथे आल्या होत्या. त्यामुळे बक्षीपूर येथील घराला कुलूप होते. ही संधी साधून चोरट्यांनी बंद घरातील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील १ लाखांची रोकड व ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. आपल्या घराच्या बांधकामासाठी त्यांनी बँकेतून ही रक्कम काढून घरात ठेवली होती. घरात चोरी झाल्याचे समजल्यावर त्यांना मोठाच धक्का बसला. त्यांच्या घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या गणेश शामराव महाजन व शहरातील राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शांताराम लालचंद महाजन हे परिवारासह सिहोर येथे गेले आहेत. त्यांचेही घर बंद आहे. ही संधी साधून चोरट्यांनी तिथे हातसफाई केली. घरमालक घरी नसल्याने किती ऐवज चोरीस गेला याची माहिती मिळू शकली नाही. चंद्रभागा माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांचे मार्गदर्शनाखाली फौजदार सचिन नवले हे पुढील तपास करीत आहेत..