जळगाव : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगाव जिल्ह्याच्या दौर्यात केवळ घोषणाबाजी केली. प्रत्यक्षात जळगाव जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक, युवावर्ग, बेरोजगार यांच्याबाबत कुठलाही ठोस निर्णय जाहीर केला नाही. दौर्यात मुख्यमंत्र्यांनी जिल्हावासियांच्या तोंडाला केवळ पाने पुसल्याचा आरोप ठाकरे गटातर्फे शुक्रवारी पत्रकार परिषदेत करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौर्यानंतर ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, महिला आघाडीप्रमुख गायत्री सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेतली. पुढे गुलाबराव वाघ म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकर्यांच्यावतीने आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी भोकर येथे गेलो होतो. तसे पत्रही आम्ही जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले होते. मात्र त्याठिकाणी निवेदन देता येणार नाही असे सांगून आम्हाला अटक करण्यात आली. आम्ही काय आतंकवादी आहोत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री जळगाव जिल्ह्याच्या दौर्यात कापसाला मोठा भाव जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी कापसाबाबत कुठलीही घोषणा केली नाही. जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांच्या तोंडाला पानेच पुसल्याचा आरोप भंगाळे यांनी केला.