मुंबई : वृत्तसंस्था
शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देण्यात आलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता, त्यानंतर पुन्हा आता जोरदार धक्का बसण्याची चिन्हे दिसू लागली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. त्यानंतर पुन्हा ठाकरे गटाला मोठ्या धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निवडणूक आयोगानं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशाल या चिन्हाचाच वापर करावा लागणार आहे. मात्र इथेही ठाकरे गटाच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्यात आलेल्या मशाल चिन्हावर समता पक्षाने दावा केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला देण्यात आलेलं मशाल चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी समता पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. आज सकाळी 10 वाजता समता पक्षाचे शिष्टमंडळ याच पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगात जाणार आहे. समता पक्षाचे अध्यक्ष उदय मण्डल यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ आयुक्तांची भेट घेणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले होते. दोन्ही गटाकडून शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर दावा करण्यात आला होता. दोन्ही गटाकडून दावा करण्यात आल्यानं निवडणूक आयोगानं अंतिम निकाल येईलपर्यंत पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं होतं.
समता पक्षाचा दावा शुक्रवारी निवडणूक आयोगाने निर्णय दिला. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाला मशाल याच चिन्हाचा वापर करावा लागणार आहे. मात्र आता मशाल या चिन्हावर देखील समता पक्षाने दावा केल्यानं ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. आज सकाळी दहा वाजता याच पार्श्वभूमीवर समता पक्षाचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे जाणार आहे.