अमळनेर :- प्रतिनिधी
येथुन जवळच असलेल्या धुळे व जळगाव जिल्ह्याच्या सरहद्दीवरील खान्देश गंगा, सुर्यकन्या तापी व पांझरा नदीच्या संगमावर दक्षिण तीरावर हजारो वर्षांची परंपरा असलेले पुरातनकालीन, जागृत व नवसाला पावणारे स्वयंभू त्रिपींडी “श्री क्षेत्र कपिलेश्वर ” महादेवाच्या खान्देशातील मोठा पंधरा दिवसीय यात्रोत्सवला दिनांक १८ फेब्रुवारी महाशिवरात्रीपासुन सुरुवात होत आहे. महाराष्ट्रात पहिले अखिल भारतीय संत संमेलन श्री क्षेत्र कपिलेश्वर येथे महामंडलेश्वर स्वामी हंसानंद महाराज यांनी भरविल्यापासुन, विविध धार्मिक विधीला येथे मान्यता मिळाली. तेव्हापासून खान्देशसह परप्रांतातून मोठ्या प्रमाणात भाविक यात्रोत्सवकाळात येऊन पितृशांतीसह विविध विधी व शांती करतांना. परिसरातील निरंकारी भजनी मंडळाकडून शिवरात्रीचा जागर महाशिवरात्री पर्वा निमित्त करतात. दुसऱ्या दिवशी आमावस्या असल्याने मांत्रिक- तांत्रिक रात्री तापी स्नान करतात व सवाद्य कपिलेश्वराचे दर्शन घेतात. महाशिवरात्री निमित्ताने यावर्षी कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने निर्बंधमुक्त यात्रोत्सव साजरा करण्यासाठी मंदिर प्रशासन सोमवार पासून सज्ज झाले आहे. पार्किंग, भक्त निवास, पाणीपुरवठा, नदीपात्रात दुर्घटना टाळण्यासाठी स्वयंसेवक, रंगीबेरंगी विद्युत रोषण करण्यात मग्न असल्याचे विश्वस्थ तुकाराम चौधरी यांनी सांगितले. विविध धार्मिक ग्रंथात उल्लेख असलेल्या श्री क्षेत्र कपिलेश्वर येथे पुरातन काळापासून तप, यज्ञकर्म आदींची कपिलमुनींनी सुरूवात करून काही काळ तपश्चर्या व योगसाधना केली. त्यावेळी कपिला गाय येत असे त्यावरून शेकडो वर्षांपूर्वी श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिरातील त्रिपींडी महादेवाची स्थापना केल्याचा इतिहास शिलालेखावरून आढळतो. संस्कृत व मोडी लिपीत दिपमाला व मंदिराच्या तटरक्षक भिंतीवर लिहीलेले शिलालेख आजही पहावयास मिळते. सतराव्या शतकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी कपिलेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा शिला लेखासह मंदिराच्या हेमांड पंथीय आकर्षक व विलोभनीय बांधकाम १६ व्या शतकात झाल्याचे शिलालेख येथे आजही दिसतात. मंदिरचे बाधकाम पूर्ण काळ्या पाषाण दगडांनी बांधले आहे तर १८ दगडी खांबावर मोठा सभामंडप व त्यावर तीन घुमट व एक मध्यभागी मुख्य घुमट असे पूर्वाभिमुख मंदिर आहे. दररोज सूर्यकिरण थेट त्रिपिंडीवर येऊन दर्शन घेतात हा विलक्षण क्षण काहीकाळच भक्तांना अनुभवता येतो, पायथ्याशी तापी व पांझरा नदीचे विहंगम सगमस्थळ आहे. दोन्ही बाजूला पाणी व नौकेतून नौकानयनचा आनंद घेत धुळे जिल्ह्यातील शिरपूर व शिंदखेडा भागातुन भावीक दर्शनासाठी येतात तर माजी मंत्री जयकुमार रावल हे सुद्धा नौकेतून मंदिर स्थळी येऊन दर्शन घेतात मात्र येथे खोल डोह असल्याने खबरदारी घेतली जाते. मंदिर शेजारी अनिरुद्ध बापूचा आश्रम असल्याने भक्त परिवार मुंबई व बाहेर राज्यातूनही महाशिवरात्रीला कपिलेश्वर दर्शनासाठी येतात. कपिलेश्वर मंदिर हे नकाशावर व इतिहासात असूनही त्यासाठी मात्र एक इंच जागा प्रत्यक्षात उताऱ्यावर नाही म्हणून संस्थांनचे सचिव मगन पाटील यांनी प्रयत्न केले असून पर्यटन स्थळाचा दर्जा मिळणेसाठी व मंदिर परिसरात विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यात्रोत्सव काळात अमळनेर आगारातून थेट कपिलेश्वर मंदिरापर्यंत दररोज तासाला एक बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर शिंदखेडा व शिरपुर येथून ही पलीकडील मुडावद व भोरटेक पर्यंत बससेवा सुरू केली आहे. खाजगी वाहन ही मंदिरापर्यंत जाण्यासाठी थेट डांबरी रस्ता आहे. मारवड व बेटावद पोलीस आणि परिसरातील माध्यमिक विद्यालयातील स्काऊट गाईड गर्दीवर नियंत्रण ठेवतील. मंदिर संस्थानने भाविकांचे सुलभ दर्शन होण्यासाठी महिला स्वयंसेवक मदत करणार आहेत. गेल्या सहा महिने पासून कपिलेश्वर मंदिर संस्थानचे पदाधिकारी हे तालुक्यातील गावागावात जाऊन वर्गणी गोळा करून मंदिर परिसरात संरक्षण भिंत यांसह विविध विकास कामे करीत आहेत. तसेच भाविकांना कपिलेश्वर महात्म्य कळावे म्हणून कपिलेश्वर मंदिरस्थळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून महामंडलेश्वर हंसानंद तीर्थ, आमदार अनिल पाटील, यांसह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहे. अमळनेर येथील मत्स्य व्यवसाय मंडळाकडून येणाऱ्या भक्त परिवारास महाशिवरात्री निमित्त साबुदाणा खिचडी व उपवास फराळ वाटप करण्यात येत असते. त्यासाठी स्वतंत्र मंडप व पाणी व्यवस्था मत्स्य व्यापारी संघाकडून करण्यात आली आहे. मुख्तार खाटीक व मित्र परिवार मेहनत घेत आहेत.