मुंबई : वृत्तसंस्था
निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव व धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. त्यावरुन आज कणकवली येथे पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गट तसेच नारायण राणेंवरही घणाघाती टीका केली.
संजय राऊत म्हणाले कि, पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून कुत्रा मालक होत नाही आणि मालक भिकारी होत नाही, तर रावणाला धनुष्यबाण पेलवणार नाही. ते धनुष्यबाण रावणाच्या छाताडावर पडेल. शिंदे गटाचे आमदार हे आमिषाला बळी पडून बाहेर पडले आहेत. त्यामुळे शिवसेना हा पक्ष त्यांच्या मालकीचा कसा? निवडणूक आयोगाचा हा निर्णय सर्व कायदे पायदळी तुडवून दिला आहे. याविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाला जाब विचारणे गरजेचे आहे. शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंकडे गेल्यावरुन नारायण राणे यांनी आनंद व्यक्त करत काल उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्यावर नारायण राणेंना उद्देशून संजय राऊत म्हणाले, शिवसेनेशी नारायण राणे यांचा काय संबंध? उगीचच बेगाने शादीमे अब्दुल्ला दिवाना झाले आहेत.