जळगाव : प्रतिनिधी
बँकेतून बोलत असल्याचे सांगून कार व बिझनेस लोन मंजूर करून देण्याच्या नावाखाली साहिल वसंतराव गाढे (२८, रा. आव्हाणे शिवार) यांना २३ लाख २४ हजार ६९२ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. तरुणाकडून ऑनलाइन पद्धतीने पैसे ट्रान्स्फर करून घेऊन संशयितांनी कर्ज न देता त्याची फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर सायबर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
साहिल गाढे हे पाळधी येथील एका कंपनीत व्यवस्थापक म्हणून कामाला आहे. सन २०२० मध्ये ते मालवाहू वाहन पुरविण्याचे काम करीत होते. त्यामुळे त्या कंपनीतील व्यवस्थापक महेश चव्हाण यांच्याशी त्यांची ओळख झाली होती. जुलै २०१२ मध्ये गाढे यांनी चव्हाण यांच्या व्हॉट्सअॅप स्टेट्सवर लोनची जाहिरात पाहिली. १४ लाखांपर्यंत कार लोनची गरज असल्यामुळे त्यांनी चव्हाण यांना संपर्क साधून संपूर्ण कागदपत्रे पाठविले. नंतर चव्हाण यांनी तुझी फाईल मुंबईच्या कार्यालयात पाठविली असल्याचे सांगितले. काही दिवसांनी पूजा चौहान नामक महिलेने तरुणाला फोन करून तुमचे सिबिल रेकॉर्ड कमी असल्याने तुम्हाला लोन मिळणार नाही, असे सांगितले. पुन्हा दोन ते तीन दिवसांनी चौहान हिने तरुणाला संपर्क साधून तुम्हाला लोनची आवश्यकता असेल तर सिबिल रेकॉर्ड वाढवून देईल, त्याच्या प्रोसेस फीसाठी २० हजार भरावे लागतील. त्यानुसार तरुणाने रक्कम भरली. त्यानंतर कंपनी ४० लाख रुपये बिझनेस लोन देत असून फाईल मंजूर करून देण्यासह विविध प्रोसेसिंग फीच्या नावाखाली गाढे यांच्याकडून वेळोवेळी एकूण २३ लाख २४ हजार ६९२ रुपयांची रक्कम उकळली. अखेर गाढे यांनी रक्कम परत द्यावी किंवा लोन मंजूर करून द्यावे, अशी मागणी मागणी केली. मात्र, चौहान हिने धमक्या देऊन पैशांची मागणी केली.