जळगाव : प्रतिनिधी
शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील नागसेन नगरातील २८ वर्षीय तरुणाला पाच जणांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून धारदार वस्तूंसह लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी रात्री उशीरा एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शहरातील नागसेन नगरात मुकेश रोहिदास झाल्टे (वय-२८) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. ४ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास रामेश्वर कॉलनीतील अशोक किराणा दुकानजवळ उभा असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून रामेश्वर कॉलनीतील पाच जणांनी फरशी, चॉपर, लोखंडी रॉड, दारूची बाटली आणि काठी याने बेदम मारहाण करून डोक्याला, हाताला, मानेला आणि पाठीला गंभीर दुखापत केली. जखमी झालेल्या मुकेशला खासगी उपचारार्थ दाखल रुग्णालयात उपचारार्थ करण्यात आले आहे. मुकेशने दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री उशिरा एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयित पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.