अमळनेर : प्रतिनिधी
अमळनेर शहरातून विप्रो कंपनीचा ३३ लाखांचा १८ टन १०० किलो साबण चोरीप्रकरणी अमळनेर पोलिसांनी चारपैकी एका आरोपीला राजस्थानमधून अटक केली आहे.
९ जानेवारी रोजी विप्रो कंपनीचा ९८० बॉक्स भरलेला साबण कर्नाटक येथे नेण्यासाठी मामा ट्रान्सपोर्टचा ट्रक (आरजे११ / जीए ८१३८) मालक पुष्पेंद्रसिंग सुदानसिंग चहर याच्याकडे ६२ हजार ४४५ रुपये भाडे ठरवून रवाना करण्यात आला होता. कैलास श्रीराम गुजर (भिलवाडा, राजस्थान) हा ट्रक चालवत होता. मात्र मुदतीत हा माल पोहोचला नसल्याने विप्रो व्यवस्थापक अनिल कुमार माईसुख पुनिया यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे, मिलिंद भामरे, सुनील हटकर, नीलेश मोरे यांनी त्यातील एक सहभागी आरोपी जगदीश बालकिसन भार्गव (२६, राजस्थान) याला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलिस करत आहे.