जळगाव : प्रतिनिधी
शहरातील इच्छादेवी चौक ते डी-मार्ट पर्यंतचा रस्त्याच्या कामाची पाहणी आज आ.एकनाथराव खडसे यांनी दुपारी केली. रस्त्याची प्रत्यक्ष पहाणी करत रस्त्याचे मोजमाप केले असता, एका बाजुच्या रस्त्याच्या मध्यभागातुन कडेपर्यंत डीमार्ट जवळ 8.10 मीटर, तर काही ठीकाणी 7, 7.5 मीटर एवढीच रुंदी असुन कामाचा दर्जा देखील निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सायंकाळी आ.राजुमामा भोळे यांनी एक प्रसिध्दी पत्रक काढले आहेत. आ.भोळे म्हणतात की, इच्छादेवी चौक ते डी-मार्ट पर्यंत होणाऱ्या रस्त्यांचे काम थांबविणे म्हणजे जनतेच्या भावनांशी खेळणे असेच होय.
आ.भोळेंच्या प्रसिध्दी पत्रात म्हटले आहे की, जळगाव शहरातील गेल्या 2 वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छादेवी चौक पासून सुरु झालेले काम हे सावर्जनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत असून सदर कामाठीकानी आज राष्ट्रवादी पक्षाचे नेते आ. एकनाथराव खडसे यांनी पाहणी करण्यासाठी गेले असता, सदर कामासंबंधी डी-मार्ट येथील संरक्षण भिंतीच्या मुद्द्यावरून सदर सुरु असलेले काम सावर्जनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बंद करावयाचे सांगितले. परंतु सदर काम तेथील स्थानिक रहिवासी व जळगाव शहरातील नागरिकांच्या सतत मागणीमुळे व रस्त्याची झालेली दुर्दशा पाहून सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांच्याकडून निधी उपलब्ध करून काम मंजूर करण्यात आले. या कामाकरिता मनपा व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी ना-हरकत दाखला दिल्यावरच हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरु करण्यात आले. परंतु आज या ठिकाणी हे काम थांबवावे ही मागणी करणे म्हणजेच जनतेच्या भावनेशी खेळणे असे होईल. सदरचा रस्ता हा श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत अत्यंत महत्वाचा रस्ता असून मागील वर्षी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शहरातील श्रीगणेश मंडळांनी सदरच्या रस्त्याचा बहिष्कार केला होता. हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन शहरातील व शहरात येणाऱ्या नागरिकांना चांगल्या प्रतीचा रस्ता वापरासाठी खुला करावा अशी मागणी तेथील रहिवाश्यांची असून आपण तश्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाला दिल्या आहेत.