मुंबई : वृत्तसंस्था
ठाकरे गटाचे नेते खा.संजय राऊत यांना धमकीचा फोन आल्याने ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. पत्रकार वारीसे यांच्या हत्येचा मुद्दा उचलाल तर तुमचाही शशिकांत वारीसे करु, अशी धमकी राऊत यांना केली आहे. हि माहिती स्वत: राऊत यांनी दिली आहे.
वारीसे यांच्या कुटुंबाला भेटायला न जाण्याची ताकीद देखील संजय राऊत यांना देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करा, अशी मागणी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. संजय राऊत म्हणाले, शशिकांत वारीसे यांचा विषय उचलू नका म्हणून मला धमकी आली. या प्रकरणी मला सतत फोन येत आहेत. मात्र मी भित नाही, मी जाहीरपणे हा विषय हाती घेतला आहे. मी कोकणात जाणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार इथल्या प्रस्तावित रिफयनरीला विरोध करणाऱ्या पत्रकार शशिकांत वारीसे यांचं हत्या प्रकरण सरकारला अडचणीचं ठरणार आहे. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानामुळं वारीसे यांची हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत म्हणाले, “स्थानिकांचा या रिफायनरीला विरोध आहे. त्यामुळं शिवसेना त्यांच्या पाठिशी आहे. पण जेव्हापासून राज्यातील सरकार बदललं आहे. या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री लोकांना वारंवार धमकावत आहेत की कोणत्याही परिस्थित आम्ही रिफायनरी इथं घेऊन येणारचं. जर याला विरोध कराल तर तो विरोध आम्ही मोडून काढू. अशा प्रकारच्या धमक्या जर सरकारकडून दिल्या जात असतील तर त्या ठिकाणचे जे गुंड आहेत त्यांना बळ मिळेल”