नाशिक : वृत्तसंस्था
लेट फी व पेनल्टी भरण्याची नोटीस न काढण्यासाठी 15 हजार रुपये लाच घेताना जीएसटी भवन येथील व्यवसाय कर अधिकाऱ्याला सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.
स्वप्नाली सतीश सावंत (वय 39) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. सांगली एसीबीने ही कारवाई गुरुवारी केली. याबाबत 42 वर्षाच्या महिलेने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Sangli ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार महिला काम करत असलेल्या हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांचे व्यवसाय कर व परफॉर्मन्स बोनस यावरील लेट फी व पेनल्टी भरण्याची नोटीस न काढण्यासाठी स्वप्नाली सावंत यांनी 25 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती 15 हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदार यांनी सांगली एसीबीकडे तक्रार केली.
सांगली एसीबीच्या पथकाने बुधवार (दि.8) आणि गुरुवार (दि.9) पंचासमक्ष पडताळणी केली असता व्यवसाय कर अधिकारी स्वप्नाली सावंत यांनी 25 हजार रुपये लाचेची मागणी करुन 15 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. पथकाने सापळा रचून तक्रारदार महिलेकडून लाच घेताना स्वप्नाली सावंत यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली एसीबी पोलीस उपाधीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, पोलीस अंमलदार धनंजय खाडे सीमा माने, अनिस वंटमुरे, जाधव यांच्या पथकाने केली.