औरंगाबाद : वृत्तसंस्था
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला. हा हल्ला शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.यानंतर आता आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान आता अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाणार आहे. या यात्रेत आता जास्त पोलिस बंदोबस्त असणार आहे. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान महालगावात यात्रा आणि रमाईंची मिरवणूक एकाच वेळी शुरु झाल्याने हा वाद झाला होता. मिरवणूकीवेळी डीजे बंद करायला सांगितल्याने वाद सुरू झाला. यानंतर आंबादास दानवे आणि आदित्य ठाकरे यांची गाडी आडवण्याचा प्रयत्न देखील झाला होता.तसेच काही प्रमाणात गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक ही झाली. त्यानंतर आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या कार्यक्रमादरम्यान चंद्रकांत खैरे यांचं भाषण सुरु असताना अज्ञाताने स्टेजवर दगड भिरकावल्याचा प्रकार देखील घडला. यानंतर काही काळासाठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
हल्ला करणारे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. तर भिमशक्ती-शिवशक्ती एकत्र येऊ नये म्हणून कारस्थान केलं जात आहेत. सरकारकडून आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. तसेच सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिस आधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी देखील अंबादास दानवे यांनी यावेळी केली.