नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील सर्वाधिक चर्चेची असलेली निवडणूक म्हणजे नाशिक पदवीधर मतदार संघ होती. आज निवडणुकीचा निकाल रात्री १०.४० वाजेच्या सुमारास जाहीर झाला असून या निवडणुकीत अखेर सत्यजीत तांबे यांचा विजय झाला आहे. पहिल्याच फेरीपासून आघाडीवर असलेल्या तांबे यांनी महाविकास आघाडीनं पाठींबा जाहीर केलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला.
नाशिक विभागात एकूण 338 मतदान केंद्रावर 30 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. विभागातील 2 लाख 62 हजार 678 मतदानांपैकी 1 लाख 29 हजार 456 इतकं मतदान पार पडलं होतं. यानंतर आज याची मतमोजणी पार पडली. यामध्ये पाचव्या फेरी अखेर सत्यजीत तांबे यांना 68 हजार 999 मतं मिळाली. तर महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मतं मिळाली.
सत्यजीत तांबे यांची अपक्ष उमेदवारी ही भाजपची खेळी असल्याच्या चर्चा शिगेला पोहोचल्यानंतर ठाकरे गटात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केलेल्या शुभांगी पाटील या उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर पोहोचल्या. शुभांगी पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर महाविकास आघाडीत सूत्र हलले. ठाकरे गटाने नाशिकच्या जागेसाठी हट्ट धरला. ठाकरे गटाने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दर्शवला. त्यानंतर शुभांगी या महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील यासाठी प्रयत्न करण्यात आले. शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीच्या सर्व दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शुभांगी यांना पाठिंबा देण्यास होकार दिला. त्यामुळे शुभांगी या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार असल्याचं जाहीर झालं. या दरम्यान सत्यजीत तांबे यांचा जोरात प्रचार सुरु होता. त्यांना शिक्षक भारतीनेसुद्धा पाठिंबा दिला होता. तसेच वेगवेगळ्या शिक्षक संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला होता.