जळगाव : प्रतिनिधी
अंगणवाड्यांमध्ये प्रवेशित बालकांना शासनातर्फे पोषण आहार दिला जातो. यासाठी शासनाकडून पोषण आहाराच्या धान्यादी मालाचा पुरवठा केला जातो. पण, बुधवारी सायंकाळी जळगाव तालुक्यातील सावखेडा खुर्द येथे धक्कादायक प्रकार समोर आला. यामुळे बालकांचे आयुष्य धोक्यात येणार कि नाही असा प्रश्न येथील नागरिक विचारू लागले आहे.
पोषण आहाराच्या धान्यादी मालाच्या तब्बल १४ गोण्या एका गोठ्यात लपवून ठेवण्यात आल्या होता. हा प्रकार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी समोर आणला. सावखेडा खुर्द येथे सायंकाळी काही मुले क्रिकेट खेळत होती. त्यातील एक तरुण हा गावातील एका गोठयाजवळून जात असताना त्याला पोषण आहाराच्या धान्यादी मालाने भरलेल्या चार ते पाच गोण्या दिसून आल्या.
हा प्रकार त्याने राष्ट्रवादीचे चेतन कोळी यांच्यासह ग्रामस्थांना सांगितला. त्यानंतर कोळीसह काही ग्रामस्थांनी गोठ्यात जावून पाहिल्यावर त्यांना चार ते पाच गोण्या समोर दिसून आल्या. त्यानंतर आणखी काही धान्यादी मालाच्या गोण्या या गोठ्यातील चाऱ्यामध्ये लपविलेल्या आढळून आल्या. या प्रकारामुळे बराच गोंधळ उडाला. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.