मुंबई : वृत्तसंस्था
देशातील अर्थसंकल्प नुकताच सादर होवून त्यावर राजकारणातून विविध प्रतिक्रिया येत असतानाचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील ५० आमदारांची आज तातडीची बैठक बोलवली आहे. मुंबईमधील मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर ही बैठक पार पडणार आहे. निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या सुनावणीमध्ये शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं यासंदर्भातील निकाल लवकरच लागणार असल्याने त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिंदेंनी बोलावलेल्या या बैठकीच कारण अद्याप स्पष्टपणे सांगण्यात आलेलं नाही. मात्र पक्षचिन्ह आणि शिवसेना निर्णय अंतीम टप्प्यात असताना उद्याची बैठक महत्वाची असल्याचं सांगितलं जात आहे. पक्षचिन्हासंदर्भातील कायदेशीर घडामोडी सुरु आहेत. त्यामुळेच पक्षचिन्ह हा या बैठकीमधील महत्त्वाचा विषय असणार आहे. चिन्ह आणि पक्षाबरोबरच आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांबद्दलही शिंदे गटाची चर्चा होणार असल्याचं समजतं.
आजच केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला. त्यामधील घोषणांचा राज्यासाठी कसा फायदा कसा करु घ्यावा यासंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता, व्यक्त केली जात आहे. उद्या मुंबई महानगरपालिकेचं बजेट जाहीर होणार आहे. मुंबई महानगरपालिकेसंदर्भातील निवडणूक धोरण ठरवण्यासंदर्भातील चर्चा होऊ शकते असं मानलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वार्षीक अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे. “यंदाचा अर्थसंकल्प गरिबांना आधार देणारा, मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आहे. हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. महिला, युवा, आदिवासी, शेतकरी या सर्वांंना दिलासा देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे,” असं शिंदे म्हणाले. सर्वांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प असल्याने पंतप्रधानांना धन्यवाद देतो तसेच मी अर्थमंत्र्यांचं अभिनंदन करतो, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. “सप्तर्षी कार्यक्रम हा पायाभूत सुविधा, आर्थिक विकास आणि सर्व घटकांना प्राधान्य देणारा आहे. पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटी रुपये देण्यात आले असून त्यातून शहरी विकासासाठी चालना मिळेल,” असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
“या अर्थसंकल्पामुळे देशाचा सर्वांगीण विकास होईल. नगरविकासासंदर्भातील योजनांसाठी मोठा निधी ठेवला आहे. ज्या देशाचा पायाभूत सुविधांवर जास्त खर्च तिथे दळणवळण सुसह्य होते, त्या राज्याची व देशाची प्रगती वेगाने होते. शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ व्हावी यासाठी चांगल्या योजना आणल्या आहेत. आरोग्य यंत्रणा बळकट करणे, शिक्षण, रोजगार अशा देशातील प्रत्येक घटकासाठी योजना असलेला अर्थसंकल्प देशव्यापी असतो,” असंही शिंदे म्हणाले. “आपले प्रकल्प आहेत त्यासाठी आपण निधी मागणार आहोत. केंद्र सरकारकडे राज्य जे प्रस्ताव पाठवणार आहोत. त्यासाठी निधी मिळणार आहे. हा संपूर्ण देशाचा अर्थसंकल्प असून राज्याला त्यातून बाजुला केलेलं नाही. विरोधी पक्ष कसे म्हणणार, सत्ताधारी पक्षाने चांगला अर्थसंकल्प मांडला आहे,” असा टोला शिंदेंनी अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्यांना लगावला आहे. निवडणुका आहेत म्हणून बजेट करायचं नाही का? असा खोचक सवाल मुख्यमंत्री शिंदेंनी केला. हे दरवर्षी होणारं बजेट आहे विरोधी पक्षाने त्याचं स्वागत केले पाहिजे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.