भोकरदन : वृत्तसंस्था
राज्यात परिवारातील वाद मोठ्या प्रमाणात होत असून यात शेवटचा निर्णय म्हणून फारकत होत असते अशीच एका फारकत झाल्यानंतर न्यायालय परिसरात सुनेने पतीसह सासऱ्याच्या श्रीमुखात लगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
भोकरदन न्यायालयाच्या आवारात फारकत घेतल्यानंतर सुनेने सासऱ्याच्या व पतीच्या श्रीमुखात भडकावली. त्यामुळे दोन गटात चक्क न्यायालयाच्या आवारातच फिल्मी स्टाईल हाणामारी झाली. मंगळवारी दुपारी घडलेल्या या प्रकारानंतर भोकरदन पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील पोखरी येथील युवतीचा विवाह आडगाव भोंबे( ता. भोकरदन) येथील शुभम विनायक साळवे यांच्या सोबत झाला होता. मात्र त्यांच्यात आपसात पटत नव्हते. त्यामुळे ही विवाहिता माहेरी राहात होती. त्यानंतर नातेवाइकांनी एकत्र येऊन आपसात बैठक घेतली व फारकत घेण्याचा निर्णय घेतला होता. दोन्हीकडील नातेवाईक मंगळवारी भोकरदन न्यायालयाच्या परिसरात आले व वकिलाशी चर्चा करून नोटरी करून त्यांनी आपसात फारकत घेतली. हे सर्व शांततेत पार पडले मात्र त्याच वेळी फारकत घेतलेल्या सुनेने पळत जाऊन सासरा विनायक साळवे यांच्या कानशिलात लगावली. वडिलाच्या मदतीला धावून गेलेल्या शुभमला सुद्धा तिने मारहाण केली, त्यानंतर दोन्हीकडील मंडळी एकमेकांवर तुटून पडल्याने एकच गोंधळ उडाला. तेव्हा न्यायधीशांनी पोलिसांना पाठवले. सौम्य लाठीचार्ज करुन गोंधळ आवरण्यात आला.
न्यायालयाने गोंधळ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पोलिस कर्मचारी गोपाल सतवन यांच्या तक्रारीवरून विनायक साळवे, एक महिला, शुभम साळवे, विलास साळवे, पंडित किसन साळवे, शिवाजी भोंबे, सर्जेराव पाटील तांगडे, निवृत्ती सुभाष लुटे, गजानन वामन जगताप, देविदास सुरडकर यांच्याविरुद्ध भोकरदन ठाण्यात गुन्हा दाखल केला.