जळगाव : प्रतिनिधी
शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरून धुमाकूळ घालणाऱ्या दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. दोन जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याजवळून पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यांच्याजवळून आणखी काही दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. दरम्यान, दोन दुचाकी चोरट्यांची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी स्वतंत्र पथक तयार करून कारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश बारी, छगन तायडे, किरण पाटील यांनी नितीन सुरेश सपकाळे (२३, रा. मालोद, ता. यावल) व अजिमउद्दीन नसीरूद्दीन (३०, रा. बऱ्हाणपूर) या चोरट्यांना सापळा रचून अटक केली. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच चोरट्यांनी विविध भागातून चोरलेल्या पाच दुचाकी पोलिसांना काढून दिल्या आहेत. पुढील तपास विकास सातदिवे करीत आहेत…