चोपडा : प्रतिनिधी
चोपडा ते लासूर ही मुक्कामी एसटी बस चोपड्याकडे येत असताना अकुलखेड्यानजीक अचानक रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात उलटली. यात सहाजण जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी ६.२५ च्या सुमारास घडली.
तालुक्यातील लासूर गावी मुक्कामी राहणारी एसटी बस शनिवारी सकाळी चोपड्याकडे निघाली होती. बसमध्ये २५ प्रवासी होते. हिंगोणा गावानजीक एका वाहनाला साइड देत असताना चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि काही कळण्याच्या आत बस नाल्यात जाऊन उलटली. यात सहाजण जखमी झाले.
जखमींमध्ये लहू खंडू माळी (६९), ओम रमेश महाजन (१५) रावसाहेब रमेश सोनगिरे (४८), रमेश देवराम महाजन, सागर सोपान पाटील (४७, सर्व रा. लासूर), राजेंद्र सदाशिव पाटील (३२, रा. मामलदे) असे सहाजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये वाहक व चालकाचाही समावेश आहे.घटना घडल्यानंतर आगार व्यवस्थापक एस. ए. क्षीरसागर, कार्यशाळा अधीक्षक अनिल बाविस्कर, सहायक वाहतूक निरीक्षक ए. टी. पवार यांनी भेट दिली. तसेच जखमींना आगार व्यवस्थापकांनी काही प्रमाणात आर्थिक मदत केली. तसेच पुढील वैद्यकीय खर्चही दिला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे..