जळगाव : प्रतिनिधी
शहरातील महामार्गलगत असलेल्या हॉटेलमध्ये लग्न सोहळ्यातून नवरीचे सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण 3 लाख 54 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. चोरी करणारे चोरटे हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले असून याबाबत शुक्रवारी 27 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, मनोज विक्रम कोळी (वय-51) रा. एसबीआय कॉलनी, महाबळ, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. जळगाव तहसील कार्यालयात वाहन चालक म्हणून नोकरीला आहे. त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न गुरुवारी एका हॉटेलात झाले. सायंकाळी 7 वाजता लग्न सोहळ्यात रिसेप्शन व फोटोसेशन कार्यक्रम सुरू होते. वधूचे दागिने आणि रोकड असलेली पिशवी ही मनोज कोळी यांची पत्नीकडे होती. लग्नसोहळ्यात फोटो सेशन सुरू असतांना पैसे व दागिन्यांची पिशवी ही वधूवर यांच्या सोप्यावर पिशवी ठेवली होती. पाहूण्यांशी बोलतांना व्यस्त असतांना एक अल्पवयीन मुलाने सोप्यावरील पिशवी चोरून नेली. पुढे गेल्यावर त्याच्या सोबत एक तरूण देखील होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. पैसे व दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वत्र शोध घेतला परंतू काहीही माहिती मिळाली नाही.
हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज चेक केले असता यात अल्पवयीन मुलगा याने सोप्यावरील दागिन्यांची पिशवी सोबत असलेल्या तरूणासोबत पसार झाला. हा प्रकार घडल्यानंतर मनोज कोळी यांनी शुक्रवारी 27 जानेवारी रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.