नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात नुकतेच बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र शास्त्री वेगवेगळ्या चमत्काराने चर्चेत आलेले आहेत. नुकतेच त्यांनी हिंदू राष्ट्राचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर लवकरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. धीरेंद्र शास्त्री लखनऊमध्ये येऊन मुख्यमंत्री योगी यांची भेट घेणार आहेत. 2 ते 3 दिवसांत दोघांमध्ये भेट होऊ शकते, असं बोललं जात आहे.
धीरेंद्र शास्त्रींनी योगींना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री हे निर्मोही आखाड्याचे महामंडलेश्वर महंत संतोष दास उर्फ सटुआ बाबा यांच्यासह मुख्यमंत्री योगींची भेट घेणार आहेत. खरंतर धीरेंद्र शास्त्रींना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची अनौपचारिक भेट घ्यायची आहे. या भेटीत ते 18 फेब्रुवारीला महाशिवरात्रीला बागेश्वर धाम इथं होणाऱ्या सामूहिक विवाह कार्यक्रमासाठीही त्यांना निमंत्रित करणार आहेत. बागेश्वर बाबा यांनी मुख्यमंत्री योगींना भेटण्यासाठी शुक्रवार, 27 जानेवारी रोजी भेटीची वेळ मागितली होती, परंतु त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळं भेट होऊ शकली नाही.
आता 2 फेब्रुवारीला प्रयागराजच्या माघ मेळ्याला धीरेंद्र शास्त्रीही येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सकाळी 8:00 वाजता माघ मेळ्याला आल्यानंतर बागेश्वर बाबा गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या त्रिवेणीत पवित्र स्नान करतील. यादरम्यान ते अनेक संत-महात्म्यांचीही भेट घेणार आहेत.