जळगाव : प्रतिनिधी
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिन सोहळ्याचा मुख्य समारंभ आज सकाळी पोलिस कवायत मैदानावर साजरा करण्यात आला. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यानिमित्त विविध क्षेत्रातील गुणवंतांना पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
भारतीय प्रजासत्ताकाच्या 73 व्या वर्धापन दिन सोहळ्यास महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, महानगरपालिका आयुक्त देवीदास पवार, उप वनसंरक्षक विवेक होशिंग, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकात गवळी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण योगेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, रविंद्र भारदे यांचेसह लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. तसेच पोलिस दलाच्या तुकड्यांनी मानवंदना दिली. पालकमंत्री श्री. पाटील यांनी पोलिस दलाच्या तुकड्यांच्या कवायतीचे निरीक्षण केले. या संचलनात पोलीस मुख्यालय पुरुष/महिला, पोलीस मुख्यालय पुरुष, होमगार्ड पुरुष, एम. जे. कॉलेज NCC मुले, सेंट जोसेफ NCC बहिणाबाई युनिर्व्हसिटी NSS, आर. आर. विद्यालय RSP मुली, ओरियन इंग्लीश मिडीयम स्कुल स्काऊड व गाईड, आर. आर. विद्यालय गाईड मुली, सेंट.जोसेफ RSP मुले/मुली, श्रीराम माध्यमिक विद्यालय-RSP मुले, आर. आर. विद्यालय RSP मुले, श्रीराम माध्यमिक विद्यालय, RSP मुली, सेंट. जोसेफ गाईड मुली, सेंट. जोसेफ, स्काऊड मुले, स्टुडंट पोलीस कॅडेट आदि सहभागी झाले होते.
उपस्थितांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देतांना पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, न्याय, समता, स्वातंत्र्य या लोकशाहीच्या उदात्त मुल्यांची देणं देणारी आपली राज्यघटना जगातील एक आदर्श राज्यघटना ठरलेली आहे. या राज्यघटनेमुळे देशाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि औद्योगिक या सर्वच क्षेत्रात गतीमान वाटचाल सुरु आहे. त्या वाटचालीचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत.
प्रजासत्ताक गणराज्याची संकल्पना स्वीकारुन आपण लोकशाहीच्या मार्गाने उज्ज्वल भविष्याच्या स्वप्नाला वर्तमानात प्रत्यक्षात साकार करण्याच्या दिशेने सर्व प्रयत्नशील आहोत. सुरक्षा, आरोग्य, सामाजिक समता आणि समतोल विकास या संकल्पनांना केंद्रस्थानी ठेवून देशाची वाटचाल सुरु आहे. देशाच्या या प्रगत वाटचालीमध्ये महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय राहीलेले आहे. म्हणूनच महाराष्ट्र राज्य हे देशातील आघाडीचे आणि पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते.
स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीबा फुले, सामाजिक समतेचे पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, मौलाना अबुल कलाम आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरु, लाला लजपतराय, लालबहादुर शास्त्री, सरोजनी नायडू, लोकशाही सारख्या उदात्त मुल्यांचा वारसा देणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध महान विभूतींच्या त्यागातून भारताच्या स्वातंत्र्याची आणि स्वातंत्र्योत्तर भारत वर्षाची निर्मिती झाली. त्यांच्या आदर्श विचारांच्या प्रकाशवाटेत देशाने आतापर्यंत यशस्वीरित्या सर्व क्षेत्रात वाटचाल केली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याची घोडदौड उत्तरोत्तर उन्नत होत आहे. साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, शिल्पकला, नैसर्गिक साधनसंपत्ती, कृषी, औद्योगिक, पर्यटन या सगळ्यांसह वैचारिक चिंतनाची प्रगल्भ परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राची भविष्यातही अशीच उज्वल वाटचाल होत रहावी, यासाठी आपण सगळे मिळून विकासाच्या कल्पक आणि नाविन्यपूर्ण योजना, संकल्पना राबवू या. सामाजिक सलोखा, बंधुभाव, सौहार्दपूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी एकसंघ भावनेतून कृतीशील होऊ या. परस्पर सहकार्याने आणि समन्वयातून आपल्या महाराष्ट्राची, आपल्या देशाची आणि आपल्या समाजाची सर्वांगिण प्रगती करण्यासाठी कटीबद्ध होऊ या, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडल्यानंतर पालकमंत्री श्री. पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक व मान्यवरांना त्यांच्या जागेवर जाऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्र्यांना पोलीस दलामार्फत मानवंदना देण्यात आली. पोलीस दलाच्या बॅण्डपथकाने वाजविलेल्या देशभक्तीपर गीतांच्या धुनमुळे कार्यक्रमस्थळावरील वातावरण भारावले होते.
मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमानंतर ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत अर्णव दिनकर पाटील, ए. टी. झांबरे, प्राथमिक विद्यालय, जळगाव, रुग्वेद श्रीपाद पेडगावकर, न्यु इंग्लीश स्कूल, जामनेर, वेंदात प्रविण माळी, शिंदे इंटरनॅशनल स्कुल, पाचोरा, जितीशा अमित सोमाणी, सेंट जोसेफ कार्न्व्हेन्ट स्कुल, जळगाव. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा इयत्ता 8 वी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत अश्विन भाऊसाहेब पाटील, जवाहर नवोदय विद्यालय, साकेगांव, ओम गोपाल चौधरी, सेंट जोसेफ कार्न्व्हेन्ट स्कुल, जळगाव, ईश्वरी सुनिल पाटील, निर्मल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा, प्रांजल नरेंद्र चौधरी, सेंट जोसेफ कार्न्व्हेन्ट स्कूल, जळगाव. राष्ट्रीय छात्र सेनेच्या 18 महाराष्ट्र बटालियनची कॅडेट नेहा नितीन परमार, एम. जे. कॉलेज आणि वेदांत समाधान पवार, काशिनाथ पलोड शाळा, जळगाव यांना चंदिगड येथे झालेल्या इंटर डायरेक्टोरेट शुटिंग स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त. चेतन राकेश बडगुजर, नुतन मराठा महाविद्यालय, जळगाव, भुषण शिवदास गोरे, ए. एस.सी. महाविद्यालय, जामनेर, शिवम प्रविण पाटील, कशिनाथ पलोड शाळा, जळगाव यांना दिल्ली येथे झालेल्या ऑल इंडिया थलसेना कॅम्प 2022 मध्ये सहभाग नोंदविल्याबद्दल सन्मानचिन्ह देण्यात आले. सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्यतर्फे सैन्य पारितोषिक नायक सोनवणे निलेश रामभाऊ मु.ता.भडगाव यांचा दिनांक 10 जुलै 2021 रोजी जम्मू-कश्मिर मधील नियंत्रण रेषेजवळील क्षेत्रात झालेल्या युद्धजन्य तणावाच्या परिस्थितीत कर्तव्य बजावत असतांना धरातार्थी पडले व कर्तव्य बजावत असतांना त्यांना वीरमरण आले. तसेच त्यांचा मृत्यू पश्चात त्यांचे वारसदार श्रीमती लयाबाई सोनवणे वीरमाता यांना तांब्रपट देवून सन्मानित करण्यात आले. येत आहे. मगर रमेश साहेबराव 231 BnCRPF यांना 1 जुन, 2018 देशांतर्गत सुरक्षा संबंधी मोहिमेत कोंडापारा, आरनपुरा, पोलीस स्टेशन, दंतवाडा, छत्तीसगड येथील जंगल क्षेत्रात माओवाद्यांनी केलेल्या आ.ई.डी. विस्कोटात डावा पाय व हाताला गंभीर जखमी होऊन गुडघ्यापासून खाली डावा पाय काढण्यांत आल्यामुळे 73 टक्के अपंगत्व आले असल्याने महाराष्ट्र सरकार तर्फे तांब्रपट देवून सन्मानीत करण्यात आले.
यावेळी श्रीमती अनिता पाटील (योगा प्रशिक्षक) योगानृत्य, रा. का. मिश्र विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बहादरपूर, ता.पारोळा, जि. जळगाव (लेझीम व झांज पथक), पोलीस मुख्यालयातील कराटे प्रशिक्षणार्थी (कराटे- प्रात्यक्षिक), पोलीस दलातील QRT पथक (आतंकवादी हल्ला व सुटका प्रात्यक्षिक) आदिंनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती अपूर्वा वाणी आणि श्रीमती सरिता खाचणे यांनी केले.