अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील एका सायकलस्वारास मोटारसायकलने धडक दिल्याने त्यात सायकलस्वार इसमाचा मृत्यू झाल्याची घटना २४ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास धरणगाव- अमळनेर रस्त्यावरील म्हाडा सोसायटी समोर घडली. मोटारसायकल चालकाविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत छगन जगन लोंढे (५५, म्हाडा कॉलनी) हे सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शौचास जाऊन येतो, असे सांगून सायकल घेऊन घरून निघाले होते. धरणगावकडून अमळनेरकडे येणाऱ्या विना क्रमांकच्या मोटारसायकलने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात त्यांच्या हात, पाय व डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एम. पाटील यांनी त्यास मयत घोषित केले. सुखदेव छगन लोंढे याने अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून मोटारसायकल चालक अरुण सातपुते याच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.